consultation

गुंजवणे

ग्रामपंचायत

Location

पर्यटन

Balekilla

।। राजगडची नावे ।।

शहामृग पर्वत - घनदाट अरण्य, विशाल पसारा, विशाल भूभागावर मान उंचावत विराजमान झालेला हा पर्वत काहीसा शहामृगासारखा दिसत असे. म्हणून यास शहामृग पर्वत म्हणत असत. ब्रम्हेश्वराचा पर्वत - स्वयं ब्रम्हऋषिने या जागी ठाण मांडले. जलकुंडाच्या तटी, आपल्या कमलकरांनी शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली. इथेच ब्रम्हऋषिनी तप केले. शंभु महादेवास प्रसन्न केले. स्थानास महात्म्य लाभले. तेव्हापासुन नाव रुजु झाले ब्रम्हेश्वराचा पर्वत. ब्रम्हेश्वर पर्वताचा दुर्ग झाला प्रतिष्ठा नगरी नांदणाऱ्या सातवाहन कुलाच्या दक्षिणापती सम्राट गौतमीपुत्र, सातकर्णी याने साम्राज्य हिताच्या दृष्टिने व व्यापार वाढिच्या दृष्टिने दुर्ग निर्मिले. ब्रम्हेश्वर पार्वतास दुर्गरुप देणारा हाच तो आदय जनक होय. या ठायी कच्ची तटबंदी याच काळात निर्माण करण्यात आली. ब्रम्हेश्वर पर्वत ते मुरुंब देवाचा डोंगर - सातवाहन लयाला गेल्या नंतर राष्ट्रकुट राजे, वाकाटक, देशी चालुकांचं साम्राज्य आलं, तयांचे सामंत शिलाहार राजे, राजा भोज शिलाहार, यांनि इथे कारभार केला. या नंतर शेकडो वर्षाच्या कालाधीमध्ये हळुहळु ब्रम्हेश्वर या शब्दाचा अपभ्रंश होऊन भरमदेवाचा डोंगर ते मुरुम देवाचा डोंगर असे नामकरण झाले. मुरुम देवाचा डोंगर ते राजगड ऐतिहासिक साधना वरुन शिवाजी महाराजांनी राजगड कधी घेतला याचा उल्लेख मिळत नाही. १६४५ मध्ये रोहिड खोऱ्याच्या देशपांड्यास अदिलशहाचे पत्र आले होते, त्यात अदिलशहाने लिहिले होते, शहाजिच्या मुलाने पुंडावा केला असुन त्याने प्रचंड गड घेऊन त्याच्या समोरील मरुंब देवाच्या डोंगरावर बांधकाम करुन पदमावती, सवेळा, संजिवनी, बालेकिल्ला अशी माच्यांना नावे देऊन संपूर्ण गडास राजगड असे नाव दिले आहे. यावरुन तोरणा घेतला तेव्हा राजगडाचे बांधकाम होऊन गडास नाव देण्यात आले होते. राजगड ते नबिशहागड - १७०४ मध्ये औरंगजेबाने या गडास वेढा घातला. व गड ताब्यात घेतला. त्या वेळी त्याने राजगडाचे नामकरण नबिशहागड असे केले. नबिशहागड ते राजगड - औरंगजेबाने हा गड जिंकुन घेतला पण हा किल्ला मोघलांना जास्त काळ राखता आला नाही. परिणामी थोड्याच दिवसात मराठ्यांनी नबिशहागड ताब्यात घेतला व त्याचे नामकरण राजगड असे केले.

।। राजगडची दरवाजे ।।

शिवाजी महाराजांनी आज्ञापत्रात लिहून ठेवले आहे की, दरवाजे बांधावे ते खालील मारा चुकऊन, पुढे बुरुज देऊन, येता जाता मार्ग बुरुजाचे आहारी पडोन दरवाजे बांधावे. किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब (दोष) या करीता गड पाहून एक दोन तीन दरवाजे तैशाच चोरदिंड्या करुन ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्या पाहिजेत तितक्या ठेऊन वरकड दरवारजे व दिंड्या चिणून टाकाव्या इमारतीवर मामलेदार गौडे आदि करुन ठेवणे ते बरे शाहणे, कृतकर्मे निरालस्य पाहून ठेऊन गडाची इमारत मुस्तद करावी. - वरील ओळी किल्ल्यांना अनेक दरवाजे असावेत या गोष्टीचे महत्व पटवून देतात. म्हणून राजगडास लहान मोठे असे नऊ दरवाजे आहेत. त्यातील सहा लहान असून महाराजांच्या अनेक दरवाजे या नियोजनावरुन देवगिरीची आठवण येते. देवगिरी किल्ल्याला एकच व्दार होते. शत्रुने ज्यावेळी मुख्य दरवाजातून प्रवेश केला त्यावेळी अक्षरशः कोंडमारा झाला. व यादवांचे साम्राज्य संपुष्टात आले. त्यामुळे राजांनी अनेक दरवाजे ही कल्पना राबविली.

।। बालेकिल्ला ॥

हा फारसी शब्द आहे. याच शब्दाला अधित्यका हा शब्द पर्याय म्हणून दिला आहे. बालेकिल्ला म्हणजे किल्ल्याच्या आतील किल्ला. राजांचे रहाण्याचे ठिकाण, धान्य, कापड - चोपड, खजिना सुरक्षित ठेवण्याचे ठिकाण. राजगडचा बालेकिल्ला सर्वात सुंदर आहे. राजगडावर जाऊन बालेकिल्ला न पाहणे म्हणजे काशीला जाऊन काशी विश्वेश्वराचे दर्शन न घेता परत येण्यासारखे आहे. ...

।। वास्तुदर्शन ॥

बालेकिल्ला दरवाजा, जननीदेवी मंदर, चंद्रकोर टाके, ब्रम्हेश्वर मंदिर, टाक्यांचा समुह, ब्रम्हऋषिगुहा, प‌द्मावती बुरुज, चोर दरवाजा, कोठारांचां समुह, संजिवणी बुरुज, राणीवसा, राजवाडा, सदर, बारुदकोठार, कडेलोट, सुवेळा बुरुज.

Balekilla
Balekilla

।। संजिवणी माची ।।

या माचिस संजिवणी नाव ठेवण्याचे मागे अनेक कथा सांगतात. या दक्षिणेकडील भागात संजिवणी नावाची वनस्पती मिळत असे. यामुळे या भागाला संजिवणी असे नाव पडले. या माचिचे बांधकाम चालु असताना एक कामगार सुरुंगाच्या धमाक्यामुळे माचीवरुन खाली पडला. त्यात त्याचा मृत्यु न होता तो जिवंत राहिला. म्हणजेच त्याला संजिवणी प्राप्त झाली. म्हणुन या भागाचे नामकरण संजिवणी करण्यात आले. बालेकिल्ल्याचे या भागाकडील बुरुजाचे काम चालु असताना गुंजवणे गावातील सोनवणे नामक व्यक्ति काम करताना खाली पडून देखिल तो जिवंत राहिला महाराजांच्या कानावर हि वार्ता गेल्यावर त्यांनी त्या भागात बुर्जाच्या खाली मानसासारखे एक दगडाचे शिल्प करावयास सांगितले व या माचिस संजिवनी असे नाव दिले.

।। वास्तुदर्शन ॥

संजिवनी प्रवेशव्दार चिलखती बुरुज, दुहेरी तटबंदी, गुढ प्रवेश मार्ग, विविध शिल्प, आळु दरवाजा, दोन चोरदरवाजे, निशानाची जागा, तलावांचा समुह, सदर वाड्याचे चवथरे, सरनोबातांच्या वाड्यांचे चवथरे.

।। प‌द्मावती माची ।।

राजगडाच्या उत्तरेकडील सपाट भागावर पद्मावती देवीचे देवस्थान असल्यामुळे या भागाला पद्मावती माची असे नाव ठेवण्यात आले.

।। वास्तुदर्शन ॥

पद्मावती देवीचे मंदिर, रामेश्वर मंदिर, महाराणी सईबाई साहेब समाधी, पद्मावती तलाव, गुप्त पाण्याचे तलाव, धान्याच्या कोठी, चोरदरवाजा, सरनोबत वाडा, मुदपाकखाना, राजवाडा, बारुद कोठार, अंबरखाना, राणीवसा तलाव, सदर निशानाची जागा, पालीदरवाजा.

Padmavati
Padmavati

।। सुवेळा माची ।।

मुरुंबदेवाचा डोंगर घेतल्यानंतर काही दिवसातच इथे बांधकाम करण्याचा वा तटबंदी उभा करण्याचा बेत लाल महालात शिजला. महाराजांनी मुहूर्त पाहुन या पुर्वेकडे धावलेल्या माचीवर भुमीपुजन करुन बांधकामाला सुरुवात केली. सुवेळी कामास सुरुवात केली म्हणुन माचीस नाव दिले सुवेळा. पुर्व दिशेला ही माची आहे. याच दिशेने सुर्योदय होतो. व वेळेचा प्रारंभ ही होतो. या स्थापन केलेल्या स्वराज्यात सुर्यदेवाने सर्वेद सुवेळच आणावी व प्रतिपदेच्या चंद्रकोरी प्रमाणे स्वराज्य वाढत जावे. म्हणुन सुवेळ पाहुन या ठिकानी कुदळ मारुन भुमिपुजन केले. व माचीस नाव दिले सुवेळा.

।। वास्तुदर्शन ॥

सुवेळा माची प्रवेशव्दार, गुंजवणे दरवाजा, महारटाके, डुबा, तालिमखाना, दक्षिणमुखी मारुती, सदर, मल्लीकार्जुन मंदिर, ब्रम्हऋषी शिल्प, काळेश्वरी देवी, तळयातील पंचलिंगी महादेव, भगिरथी मंदिर, जलकुंड, काळेश्वरी बुरुज, चोरदरवाजा, तिनखांबी टाके, तटातील गणपती, कळवंणतिचा माळ, अंबारी बुरुज, नेढे, हत्तीप्रस्थ, मळे चोर दरवाजा, गुहेकडे जाणारा चोर दरबाजा, तटबंदी, तटातील तलाव, दुचिलखती बुरुज, चपटदान मारुती.